Breaking News

पनवेल आरोग्य विभागातील शिपायाचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई अखेर संपली. ते कोरोनाबाधित झाल्याने दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य विभागातील ते कोरोनाचा पहिला बळी ठरले आहेत. सुरेश बाळू गुरव (50) असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयापासून ते उपजिल्हा रुग्णालय सुरू होईपर्यंत त्यांनी पनवेलमध्येच पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. शिपाई पदावर असूनही रुग्णसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुरव हे रुग्णसेवा देण्यासाठी हिरिरीने पुढे येत असत. पनवेलमधील साईनगर परिसरात ते कुटुंबासोबत राहत होते. 4 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर काही दिवस उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईच्या सेव्हनहिल रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक नागनाथ येमपल्ले, पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शोक व्यक्त केला असून सरकारतर्फे करोना योद्ध्यांना मिळणारी नुकसानभरपाई तातडीने गुरव यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

तालुक्यात 433 जणांचा मृत्यू

पनवेल शहर आणि पनवेलच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 433 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेच्या पंधराशे कर्मचारी व अधिकार्‍यांपैकी 125 जणांना करोनाची लागण झाली आहे. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी उपचारानंतर पुन्हा सेवा सुरू केली आहे. उपविभागीय अधिकारी नवले यांच्या कुटुबीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुक्त देशमुख यांची आई आजारी असून तेही कर्तव्य बजावत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply