पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस
पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 75 जणांना चष्मेवाटप करण्यात आले.
कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे, संतोष पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
कोरोना साथीचा मुकाबला करताना ’संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्या अंतर्गत सेवा सप्ताहानिमित्त पनवेल तालुका मंडल वतीने आयोजित शिबिरात नेत्ररुग्णांची तपासणी करून 75 जणांना चष्मेवाटप करण्यात आले.