कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना त्यांनी सुरू केलेल्या संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांना एकत्र घेऊन संगीत कट्टा आणि भजन कट्टा हे कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या स्वरूपात सुरू केले होते. दरम्यान, या संगीत कट्ट्यामधील सहभागी कलाकारांनी ही संगीतमय श्रद्धांजली वाहिली. भजनी गायक प्रसादबुवा पाटील यांनी पुढाकार घेऊन संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजलीचा कार्यक्रम शनिवारी (दि. 19) नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात आयोजित केला होता.
दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात नेरळचे सरपंच रावजी शिंगवा व कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे यांनी पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसादबुवा पाटील यांनी सूत्रसंचालन, तर भजनी गायक भरत भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी नेरळ शिवसेनेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे, बेलदार समाजाचे राष्ट्रीय पदाधिकारी भगवान चव्हाण, भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष बल्लाळ जोशी, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, नेरळ शिवसेनेचे उपशहरप्रमुख बंडू क्षीरसागर, विश्वजित नाथ,राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञा सोमणी आदी उपस्थित होते. या वेळी संगीत कट्ट्यामधील कलाकार मंजिरी सावंत, अक्षय जोशी, गोवे, भरत भगत, प्रसाद बुवा पाटील, बल्लाळ जोशी यांनी गीतांच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहिली, तर वादक म्हणून विवेक दहिवलीकर, अमेय जोशी, आकाश काटे, कौशिक वांजळे यांनी साथ दिली.