नागपूर : प्रतिनिधी
शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयकांवरून काँग्रेस करीत असलेले आंदोलन ही त्यांची लबाडी आहे. या विधेयकांचे आश्वासन काँग्रेसनेच आधी दिले होते. आता त्याला विरोध करीत असल्याने काँग्रेसचा चेहरा उघड झाला, अशी टीकाही या वेळी फडणवीस यांनी केली.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरून विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शिवसेना हा कनफ्युज पक्ष आहे. याचे कारण लोकसभेतील त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतील त्यांची भूमिका वेगळी आहे, पण यात नवल काही नाही. शिवसेनेला ही सवयच आहे. ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. खरे म्हणजे शिवसेनेने आधी भूमिका ठरवली पाहिजे. शेतीसंदर्भात शिवसेनेने कधी भूमिका मांडलेली नाही. मला आता त्यांना आव्हान द्यायचे आहे की, महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे तर त्यांनी राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी घ्यावी. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या का झाल्या याचे उत्तर संजय राऊत देतील का? उगाच शेतकरी प्रश्नावरून राजकारण करण्याऐवजी शेतकर्यांबाबत शिवसेनेने आधी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे आमचे मत आहे
या वेळी फडणवीस यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या पक्षाचा जो जाहीरनामा होता तो वाचला नाही. तो वाचला असता तर त्यांनी मोदी सरकारवर कृषी विधेयकांवरून आरोप केलेच नसते, असे फडणवीस म्हणाले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …