Breaking News

व्हेंटिलेटर व आयसीयू बेडच्या व्यवस्थेसह नवीन कोविड सेंटर निर्माण करा

भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची व्यवस्था तसेच नवीन कोविड सेंटर तातडीने निर्माण करावे, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी येथील महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात पगडे यांनी आयुक्तांना दिले आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात जयंत पगडे यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालय, एमजीएम कामोठे व डी. वाय. पाटील हॉस्पिटल या तिन्ही ठिकाणी पनवेल महापालिका हद्दीतील जेवढे कोरोनाबाधीत रुग्ण आहेत तेवढेच रुग्ण जिल्ह्यातील इतर भागांतून पनवेलमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना व्हेंटिलेटर, आयसीयू बेड व ऑक्सिजन बेड कमी पडत असून, रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक खासगी रुग्णालयांत दाखल होणार्‍या रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर लावून भरमसाट व गैरवाजवी बिले वसूल केली जात आहेत हे दुर्दैव आहे. उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करणे परवडणारे नसून कुटुंबाला आर्थिक व्यवस्था करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सिडकोनिर्मित कामोठे, खारघर व कळंबोली या नागरी वसाहतींमध्ये दैनंदिन 150 ते 200 कोरोना रुग्ण आढळत आहेत. आजही ही संख्या कमी झालेली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे.
पनवेल महापालिकेकडून कामोठे, खारघर व कळंबोली या सिडको वसाहतींमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आजतागायत प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत असे दिसून येते. कोरोना रुग्णांना उपचार वेळेत मिळत नसल्याने अनेक जणांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना फार मोठ्या मानसिक स्थितीतून जावे लागत आहे. उद्भवणार्‍या या परिस्थितीमुळे लोकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोषाची भावना वाढत आहे. नागरिकांमध्ये असणारा रोष व वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने नागरिकांना दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून खारघर, कामोठे व कळंबोली या प्रत्येक नागरी वसाहतीमध्ये 100 खाटांचे एक कोविड सेंटर निर्माण करून त्यात 25 व्हेंटिलेटर बेड, 25 आयसीयू बेड व 50 ऑक्सिजन बेडची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी पगडे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply