Breaking News

कळंबोलीतील एनएमएमटी बस डेपो ओसाड

कंटेनर पार्किंगसाठी होतोय वापर; परिसरातील नागरिकांसाठी झाले मैदान

पनवेल ः बातमीदार

पनवेलमधील कळंबोली येथील रोडपालीजवळ नव्याने बांधण्यात आलेले एनएमएमटी बसस्थानक अद्याप सुरू न झाल्याने ते ओस पडले असून या ठिकाणी खासगी वाहने पार्किंग करण्यासाठी या बस डेपोचा वापर करण्यात येत आहे, तसेच परिसरातील नागरिकांनी बस डेपोचा परिसर विरंगुळा केंद्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. या बस डेपोमध्ये सायंकाळी हातगाड्या लागत असून अवैध अतिक्रमण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेला एनएमएमटीचा बस डेपो हा कळंबोलीमधील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून बाहेरील बाजूस बांधण्यात आला, मात्र तो सुरू होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्या ओस पडलेल्या या बस डेपोचा वापर परिसरातील नागरिक विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, हातगाड्यांच्या अतिक्रमणासाठी, तसेच वाहन पार्किंगसाठी करीत असल्याने  केलेला खर्च वाया जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  येथे लहान मुले खेळत असल्यामुळे आणि अवैध पार्किंगमुळे एखादा अपघात होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. कळंबोली सेक्टर 15, 16, 17 या नव्याने उभ्या राहिलेल्या वसाहती आहेत. या नवीन वसाहतीतील नागरिकांना विरंगुळा केंद्राची आवश्यकता आहे, तसेच त्यांच्या लहान मुलांना खेळण्याच्या जागेची नितांत आवश्यकता आहे, पण त्यातील काहीही या परिसरात होत नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांसमोर बस डेपोत तळ ठोकल्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. या वेळी येथे बसलेल्या नागरिकांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, आम्हा नागरिकांना बसण्यासाठी या परिसरात जागाच नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग नाही. त्यामुळे आम्ही बंद असलेल्या बस डेपोत आमच्या मुलांना खेळासाठी घेऊन येत आहोत, परंतु याच बस डेपोत अवैधपणे वाहने, कंटेनर ट्रक पार्क केले जातात. त्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला विरंगुळा केंद्र, तसेच लहान मुलांसाठी मैदानाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply