Breaking News

घराघरावर भाजपचा झेंडा फडकवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

म्हसळा : प्रतिनिधी

केंद्र व राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना, निर्णय, उपक्रम राबवून देशवासीयांचे जीवनमान सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे जनता पुन्हा भाजपला निवडून देईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर भाजपचा झेंड फडकवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे गुरुवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत केले. मागील सरकारच्या तुलनेत भाजप सरकारने रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त करून दिली आहे. जिल्ह्यातील रखडलेला राष्ट्रीय मार्ग पूर्णत्वास आला आहे. त्यातून वेगवेगळ्या संधी युवकांना उपलब्ध होणार असल्याचे सांगून पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील बहुतांश नागरिक रोजीरोटीसाठी स्थलांतर हाच मुख्य मार्ग पत्करत असतात. त्याऐवजी गावातच राहा! गावाकडे चला!! ही संकल्पना आपण आपल्या गाव-वाडीत राबविणे आवश्यक आहे. आपणाकडे असणार्‍या कौशल्यातून छोटे छोटे व्यवसाय अगर उद्योगाने सुरुवात करावी. केंद्र व राज्य शासनाने फार मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा केल्या असल्याने कोकणात व दक्षिण रायगडमध्ये छोटे-मोठे उद्योग येत आहेत. सीएम फेलोशिपच्या माध्यमातून राज्यातील गावे दत्तक घेतली असून, त्या गावातील महिलांना एलईडी बल्ब, ज्वेलरी व अन्य वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती ना. चव्हाण यांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाचे सरासरी प्रमाण 3500 मिलीमीटरपेक्षा अधिक असतानाही शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईची झळ भासते. 15 वर्षे मंत्रिपद सांभाळल्यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होते, असे सांगून जे विकासाच्या नावाने बोंब मारतात ते जनतेला साधे पाणीही पाजू शकत नाहीत. हे येथील जनतेचे दुर्भाग्य असल्याची टीका पालकमंत्री ना. चव्हाण यांनी नाव न घेता केली. या वेळी ना. चव्हाण यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन रायगड किल्ल्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीसह 650 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. म्हसळा भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, तालुका अध्यक्ष शैलेश पटेल हेही उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply