खोपोली : प्रतिनिधी
शहरातील उषा नगरमधील समर्थ सोसायटी समोरील विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर गुरुवारी (दि. 14) सकाळी एका माकडाला विजेच्या धक्का बसून ते जबर जखमी झाले. त्या जायबंदी माकडाला सुरक्षितपणे काढून वाचवण्यासाठी येथील प्राणी मित्रांनी दोन तास मेहनत घेतली.
विजेचा धक्का लागून माकड जायबंदी झाल्याची माहिती शहरातील प्राणी मित्र व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जावून या माकडाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू केले. प्रथम विज वितरण कंपनी कर्मचार्यांना बोलवून वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर प्राणी मित्र व माकडाच्या स्वभाव व आरोग्यासंबधी माहिती असलेले प्राणी मित्र समीर व्होरा यांना पाचारण करण्यात आले, वनविभाच्या अधिकार्यांनाही माहिती देण्यात आल्याने त्यांचीही टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून सदर जायबंदी माकडाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून ते माकड वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.