Breaking News

तिसर्‍या आघाडीचा प्रयोग अनेकदा फसलाय

देवेंद्र फडणवीस यांची सूचक प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांची मुंबईत भेट घेतली आणि भाजपविरोधी तिसर्‍या आघाडीसंदर्भात चर्चा केली. यावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केसीआर-ठाकरे भेटीवर थेट बोलणे टाळले. ते म्हणाले की, मी पत्रकार परिषद ऐकली नाही, पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटणे यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असतानाही तेलंगणचे मुख्यमंत्री भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे याच्यात फार काही वाटत नाही.
भाजपच्या विरोधाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असे या भेटीवेळी सांगण्यात आल्यासंबंधी विचारले असता फडणवीस म्हणाले की, या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग करून पाहिला, मात्र त्यांचा हा प्रयोग फसला होता.
खरे म्हणजे तेलंगणात आता टीआरएसचीच स्थिती वाईट आहे. मागील लोकसभेत तेथे भाजपच्या चार जागा निवडून आल्या. पुढील लोकसभेत तेलंगणात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, असा विश्वास या वेळीफडणवीस यांनी व्यक्त केला.
ठाकरे सरकारकडून सुडाचे राजकारण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावरील कारवाईसंबंधी विचारले असता उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करीत आहे. या सरकारला करायचे असेल ते त्यांनी करावे. न्यायालय आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेसंबंधी बोलताना फडणवीस म्हणाले की, रोज काय होत आहे हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. राणेंवर, त्यांच्या मुलांवर होणारी कारवाई, किरीट सोमय्यांचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, रवी राणा या सगळ्या गोष्टी जनता पाहत आहे. सुडाचे राजकारण कोण करतेय हे माहिती आहे. त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येत आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply