पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील भातपिकांवर कीड आणि किटकांचा झालेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात कृषी कार्यालय यशस्वी झाल्याचा दावा तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केला आहे.
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, देवळे, वाकण, हळदुळे, दाभिळ येथे पावसाळ्यादरम्यान पडणार्या उघडीपीच्या काळात निळे भुंगेरे प्रकारच्या कीडरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला होता. क्रॉससॅप योजनेंतर्गत क्षेत्रीय कर्मचार्यांना निरीक्षणे नोंदविताना हा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्वरित कार्यवाही सुरू करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी मंडल अधिकारी व कर्मचार्यांनी गावोगावी जाऊन या उपाययोजनांबाबत शेतकर्यांची बैठक घेऊन फवारणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
कीडविरोधी फवारणीकामी देवळे येथील रवींद्र केसरकर, वाकण येथील संभाजी सालेकर, सुनील सालेकर, हळदुळे येथील कविता गायकवाड, दाभिळ येथील विठोबा दळवी, चरई येथील विठोबा कासार यांनी सक्रीय सहभाग घेतला. यामुळे शेतकर्यांचे नुकसान टाळले असल्याचे तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी सांगितले.