पुणे ः प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 26) होणारी दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकते, तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यकच आहे. भारताचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असला तरी संघ व्यवस्थापनाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. श्रेयसचा बदली खेळाडू म्हणून भारतीय सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. सूर्यकुमारने टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माही जायबंदी झाला आहे, परंतु दुसर्या सामन्यापर्यंत तो फिट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टीम इंडियाविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिका गमावलेल्या इंग्लंड संघाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. दुसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन आणि यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्स यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाले होते. आता ‘करो या मरो’च्या स्थितीत इंग्लंडच्या संघात अंतिम 11मध्ये कुणाकुणाचा समावेश असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.