Breaking News

गणित बोनस शेअर्सचे!

शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्सविषयी अनेक समज गैरसमज आहेत, अशा बोनस शेअर्सचे गणित आपण समजून घेऊ यात.

दिवाळी म्हटलं की बाकीच्या सर्व गोष्टींबरोबर नोकरवर्गाची एक हक्काची गोष्ट म्हणजे बोनस. कामगारांना आधी दर आठवड्याला पगार (वेजेस) मिळायचा. वर्षातून 52 आठवडे, परंतु मासिक पगार ही पद्धत चालू झाल्यावर 12 महिन्यांचा म्हणजे 48 आठवड्यांचा पगार मिळू लागला, म्हणजेच चार आठवड्याची आमदनी कमी मिळू लागली. त्यामुळं कामगारांनी त्यांच्या चार आठवड्याच्या हक्काचा पगारासाठी तगादा लावला आणि त्या चार आठवड्याच्या आमदनीस बोनस म्हटलं जाऊ लागलं. नंतर समन्वयानं त्यात कायद्यानं तरतूद झाली वगैरे वगैरे..

बोनस म्हटलं की, सर्वांनाच तो हवाहवासा वाटतो परंतु एकूणच महामारीच्या संकटामुळं पगार मिळतोय त्यातच सूख मानून अनेकजणांनी यावर्षी बोनसवर पाणी सोडण्याची तयारी ठेवलीय. शेअरबाजारात देखील बोनस शेअर मिळण्याची असंख्य उदाहरणं पुढं येतील. आजच्या लेखात बोनस शेअर, डिव्हिडंड म्हणजेच लाभांश, शेअरचं विभाजन, इ. कॉर्पोरेट गोष्टींबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. 

बोनस शेअर्स : समभागधारकांच्या मालकीच्या शेअर्सच्या संख्येच्या आधारे सध्याच्या भागधारकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना अतिरिक्त शेअर्स दिले जातात. ही कंपनीची जमा केलेली कमाई असते जी लाभांश स्वरूपात दिली न जाता समभागांमध्ये रुपांतरित केली जाते. अनेकवेळा आपण वाचतो, ऐकतो की अमूक एका कंपनीनं 2:1 या प्रमाणात बोनस जाहीर केला, याचा अर्थ दोन शेअर बोनस मिळणार जर तुमच्याकडं आधी त्या कंपनीचा एक शेअर असेल तर. अनेक जणांची इथं गल्लत होऊ शकते. म्हणजेच या उदाहरणात बोनस मिळाल्यानंतर एकूण तीन शेअर्स होतील. आता कंपनी बोनस का देते? याची प्रामुख्यानं दोन कारणं आहेत, ते म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व त्याद्वारे इक्विटी बेस सहभागिता वाढवण्यासाठी, ज्याद्वारे व्यवहारांमधील तरलता वाढते. दुसरं कारण म्हणजे जेंव्हा कंपनीच्या शेअरचा भाव खूप जास्त असतो, तेव्हा नवीन किरकोळ गुंतवणूकदारांना त्या विशिष्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करणे कठीण होते (उदा. एमआरएफ, हनीवेल, पेज इंडस्ट्रीज, 3एम इंडिया, आयशर मोटर्स, नेस्ले, बॉश, इ. शेअर्सची संख्या वाढल्यास प्रति शेअर किंमत कमी होते. बोनस समभाग घोषित केले तरीही एकूण भांडवल समानच असते. गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्यासाठी कंपनी आपल्या नफ्यातील काही रक्कम राखीव ठेवते. जेव्हा ही रक्कम मोठी होते, तेव्हा कंपनी हे रिझर्व्हज भाग भांडवलाच्या खात्यात हस्तांतरित करते व ज्यामधून कंपनी बोनस समभाग जारी करते. त्यामुळं अनेकांचा प्रश्न पडतो की बोनस दिल्यानं कंपनीचं नुकसान होतं का? नाही. सहसा बोनस शेअर मिळाल्यानंतर शेअर्सची किंमत बोनस शेअर्सच्या प्रमाणानं समायोजित होते. म्हणजे 1:1 बोनस असल्यास भाव निम्मा होतो.

सुपरशेअर : केमकॉन स्पेशालिटी केमिकल्स

मागील आठवड्यात शेअरबाजारात प्राथमिक समभाग विक्री पट्ट्याच्या तुलनेत 100 टक्क्यापेक्षा अधिक भावानं नोंदणी झालेली कंपनी म्हणजे केमकॉन. कॅलेंडर वर्ष 2019मध्ये कॉम्प्लेशन ब्राइन्स आणि कॅल्शियम ब्रोमाइडचे सर्वात मोठे उत्पादक म्हणून विश्वासार्ह भागीदारांपैकी एक असलेली कंपनी कॅल्शियम ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड आणि झिंक ब्रोमाइड तयार करते. ज्याची गरज जगातील प्रमुख तेल आणि वायू कंपन्यांना असते. भारतात एचएमडीएसचे एकमेव निर्माती असणारी ही कंपनी कॅलेंडर वर्ष 2019 मधील उत्पादनाच्या संदर्भात जगभरातील एचएमडीएसचे तिसरे सर्वात मोठी निर्माती ठरते. त्याचप्रमाणं, कंपनी  भारतातील सीएमआयसीचे सर्वात मोठी व जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी निर्माती आहे. हे दोन्ही घटक औषधं बनवणार्‍या कंपन्यांसाठी माध्यम म्हणून गरजेचे असतात. त्याचप्रमाणं कंपनी रासायनिक उपयोगितेसाठी कंत्राटं देखील घेते (कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग). ही केवळ 2100 कोटी रुपये बाजारमूल्य असणारी कंपनी असून प्रवर्तकांकडं 75 टक्के शेअर्स आहेत. इक्विटी भांडवलावरील परतव्याचा दर 40 टक्क्यांहून अधिक आहे तर कार्यकारी नफ्याचं मार्जिन सुमारे 27 टक्के आहे. पहिल्याच दिवशी 100 टक्के वरचा भाव खुलल्यानं गुंतवणूकदारांनी नफेखोरीस प्राधान्य दिल्यानं 731 रुपयांवरून 585 रुपयांवर बंद झाला. आयपीओमध्ये ज्यांना या कंपनीचे शेअर्स लागले नाहीत त्यांना दीर्घ मुदतीत गुंतवणुकीसाठी नक्कीच हा भाव आकर्षक वाटू शकतो.

-प्रसाद ल. भावे, (9822075888) sharpfinvest@gmail.com

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply