उरण : रामप्रहर वृत्त – जासई येथे उरण-बेलापूर रेल्वे अतिक्रमण निमित्ताने शनिवारी (दि. 3) सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक आले होते. या वेळी न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा जाब परखडपणे विचारला तसेच मागण्या पूर्ण करा आणि मगच या, असे सांगून त्यांना परतून लावले.
या अतिक्रमणविरोधी पथकामध्ये मुख्य नियंत्रक अनिल पवार, वरिष्ठ नियंत्रक सुहास राणे, सहाय्यक नियंत्रक आर. के. वेटा आणि त्यांचा इतर स्टाफ लवाजम्यासह आला होता. या वेळी सुरेश पाटील जाब विचारताना म्हणाले की, आमचा साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. 2014च्या एमटीएचएल कराराची अंमलबजावणी झालेली नाही. गावठाण विस्ताराचा प्रश्न सोडविला नाही. गाव नागरी सुविधांचा प्रश्न तसाच आहे आणि आताचा 22.5 टक्के भूखंडाचा प्रश्न अनुत्तरित आहे.घोषणा केलेले 22.5 टक्के भूखंड आम्हा प्रकल्पग्रस्तांना कुठे आणि केव्हा देणार हे पहिल्यांदा सांगा. आजपर्यंत आम्हा प्रकल्पग्रस्तांना सिडको, जेएनपीटी, रेल्वे, एनएचएआय यांच्याकडून अनेक पोकळ आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. पहिल्यांदा आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवा, दिलेली आश्वासने पूर्ण करा. मगच तुम्हाला येथे पाय ठेवून देऊ, असे सुरेश पाटील यांनी या पथकातील वरिष्ठांना सुनावले. प्रकल्पग्रस्तांचे रौद्र रूप व रोष पाहून निरुत्तर झालेले सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक हात हलवित परत गेले आणि त्यांनी आश्वासन दिले की या तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या भावना आम्ही सिडको एमडी यांना कळवितो.
या अतिक्रमणविरोधी पथकाला रोखण्याच्या कामी सुरेश पाटील यांच्यासोबत भाजपचे जासई विभाग अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र पाटील आणि इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.