पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी व्यापारी वर्गाला दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्या, अशा मागणीचे निवेदन पनवेल मनपा आयुक्तांना दिले आहे.
नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्या प्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक 5 ची घोषणा नुकतीच जाहीर केली त्यानुसार जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय यांना सर्व सरंक्षक बाबींचे काटेकोरपणे पालन करत सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
खारघरमधील व्यापारी वर्गाने लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेविका पाटील यांच्याकडे विनंती केली आहे की त्यांना त्यांचे दुकाने उघडे ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने वेळ वाढवून देण्यात यावी.कोरोना महामारीच्या काळात आधीच दुकाने बंद असल्याकारणाने मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रामुख्याने दुकानदारांच्या व्यथा आहेत त्या म्हणजे दुकानाची भाडे, कामगारांचा पगार, लाईट बिल यामुळे सर्वच व्यवसायिक त्रस्त आहेत आता कुठे दुकाने उघडून दुकानदार आपला व्यवसाय सुरू करत आहेत त्यात शासनाच्या नियमानुसार संध्याकाळी 7 वा दुकाने बंद करावी लागतात.
सध्यस्थितीत दुकानात दिवसभर दोन ते तीनच ग्राहक येतात त्यामुळे दुकानादारांचे भाडे निघेल एवढा देखील व्यवसाय अथवा विक्री होत नाही. ग्राहक यायची खरी वेळ ही संध्याकाळी 6 नंतर सुरू होते. त्यामुळे आयुक्तांनी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली आहे.
दुकानदारांचे म्हणणे
खरे ग्राहक संध्याकाळी 7 वाजेनंतर यायला सुरुवात होते कारण ग्राहक हे देखील आपल्या नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणावरून संध्याकाळी 6 वाजता सुटतात त्यामुळे त्यांना घरी येत येतच 7 वाजतात त्यामुळे ग्राहकांना देखील ते सामान अथवा वस्तू खरेदी करता येत नाहीत. दुकानदारांबरोबरच ग्राहकांची देखील अशी मागणी आहे की दुकान उघडे ठेवण्याची वेळ ही रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात यावी.