‘डब्ल्यूएचओ’ ने व्यक्त केली चिंता
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
जगभरात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून, आतापर्यंत जवळपास 10 लाखांहून अधिक लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता वाढविणारे वक्तव्य केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’नुसार जगातील दर 10 व्यक्तींमागे एकाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही सध्याच्या नोंद असलेल्या रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते.
डब्ल्यूएचओचे आपत्कालीन योजनांचे प्रमुख डॉक्टर मायकल रियान यांनी म्हटले की, गाव आणि शहरांमधील आकडे वेगवेगळे असू शकतात तसेच वेगवेगळ्या वयोगटांतील आकडेवारीही भिन्न असू शकते. याचा असा अर्थ आहे की जगातील बहुतांश लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.
कोरोना संसर्गाशी संबंधित 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मायकल रियान यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जगात कोरोनाचे तीन कोटी 56 लाख रुग्ण असून, आतापर्यंत 10 लाखाहूंन अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, मात्र संसर्ग रोखण्याचे आणि जीव वाचवण्याचेही उपाय आहेत.
देशात रुग्णवाढीचा वेग मंदावला
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी या संसर्गाचा वेग मंदावला आहे. देशात मंगळवारी (दि. 5) संपलेल्या 24 तासांमध्ये 61 हजार 267 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहता गेल्या 24 तासांतील नवे रुग्ण व मृतांची संख्या काही प्रमाणात दिलासादायक आहे.
देशात आता 66 लाख 85 हजार 83 एकूण कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये नऊ लाख 19 हजार 23 अॅक्टिव रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले 56 लाख 62 हजार 491 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या एक लाख तीन हजार 569 जणांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.