Breaking News

शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची

डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन

कर्जत ः बातमीदार

कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय येथील बीएस्सी (कृषी) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कर्जतमधील वारे गावात ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांच्या गटचर्चेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या कृषीविषयक कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि नियोजन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला वारे ग्रामपंचायत हद्दीतील प्रगत शेतकरी भानुदास म्हसे, उत्तम म्हसे, घनश्याम म्हसे, जयवंत ठाकरे, हरिश्चंद्र म्हसे, महादू शिंदे, गणपत घाडगे, देविदास म्हसे, अरुण म्हसे, जयवंत म्हसे, रामदास देशमुख, हरिश्चंद्र चवरे यांच्यासह 21 प्रगत शेतकरी उपस्थित होते. या वेळी डॉ. मर्दाने यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या भाताच्या विविध वाणांच्या गुणवैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती दिली.

सध्या शेतीकामासाठी मजुरांची वानवा असून मजुरीचे वाढते दर लक्षात घेता सर्वांनी यांत्रिकीकरणाची कास धरली पाहिजे. त्यामुळे पीक, फळबाग व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगातील वेळ आणि खर्चाची बचत होऊन हमखास उत्पादनाची शाश्वती असल्याचे डॉ. मर्दाने यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. शेतकर्‍यांनी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविल्यास शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा 10 टक्के अधिक दर मिळू शकतो. त्या अनुषंगाने आपल्यासमोर येत असलेल्या प्रयोगांचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply