महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला
महाड : प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी नसल्याने गेल्या दोन तीन महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचे पगार रखडले आहेत. महाड एसटी आगारातील कर्मचार्यांना जून महिन्याचा 75 टक्के पगार दिल्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून, आपले कुटुंब कसे चालवायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.
कोरोना संसर्गामुळे 24 मार्चपासून देशातील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. ग्रामिण व शहरी भागात वाडी वस्त्यावर धावणारी एसटीदेखील कोरोनाचे काळात बंद पडली. गेले सहा महिने कोणतेही उत्पन्न नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असणार्या सुमारे 98 हजार कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीच्या काळात 50 टक्के 25 टक्के कपात करुन जूनपर्यतचा पगार कर्मचार्यांना देण्यात आला मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही.
महाड एसटी आगारातील कर्मचार्यांना जून महिन्याचा 25 टक्के पगार तसेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा सव्वा तीन महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. गणेशोत्सवा दरम्यान एसटीची वाहतूक सुरु झाली असली, तरी अद्याप पूर्वीप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्याने एसटी वाहतूक तोट्यात सुरु आहे. महाड आगाराचे रोजचे सरासरी उत्पन्न आजमितीला दिड ते पावणे दोन लाखाचे आहे. मात्र लॉकडाऊन पूर्वी हेच उत्पन्न दिवसाला चार ते साडे चार लाखाचे होते. उत्पन्नातील ही तूट भरून निघायला बराच कालावधी लागणार आहे.
राज्यात सेवा द्यायची आहे, पण कर्मचार्यांना पगार देणे शक्य नाही, अशा अवस्थेत एसटी महामंडळ सापडले आहे. राज्य सरकारने अनुदान द्यावे आणि महामंडळाची आर्थिक कोंडी सोडवावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.