Breaking News

खालापूरची पाताळगंगा नदी प्रदूषित, जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका क्षेत्र  व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीच्या पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्र जिवंत आहे. मात्र तालुक्याची भाग्यविधाती असलेली पाताळगंगा नदी भरमसाठ  प्रदूषणमुळे बेजार झाली आहे. पाताळगंगेचे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदी क्षेत्रातील हजारो  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पातळगंगा नदीला प्रदूषित करण्याचा सर्वात पहिला मान खोपोली नगरपालिकाकडे  आहे . शहरातील भुयारी गटार योजना रखडल्याने शहरातील सांडपाणी गटारे व नाल्यांच्या माध्यमातून थेट नदीत जात आहे. त्याच प्रमाणे खोपोली शहरातील अनेक छोट्या कंपन्यांकडे रासायनिक सांडपाणी शुद्धीकरणासाठीची यंत्रणाच  उपलब्ध नाही. या कंपन्या कागदोपत्री एकदोन टँकर रासायनिक सांडपाणी  सामूहिक रासायनिक  शुद्धीकरण केंद्रात पाठवून उर्वरित हजारो लिटर रासायनिक सांडपाणी छुप्या पद्धतीने पाताळगंगा नदीतच सोडत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील अन्य कंपन्यांची असून, स्थानिक  प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व गावकर्‍यांना दाखविण्यासाठी या कंपन्यांनी त्यांच्या क्षेत्रात रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत. मात्र कंपनीचा खर्च वाचवण्यासाठी अनेक कंपन्या छुप्या मार्गाने रात्रीच्या वेळेत हजारो लिटर सांडपाणी पाताळगंगा नदीत सोडीत असल्याचेही अनेकवेळा उघड झाले आहे.

अधिक प्रमाणात घातक रासायनिक सांडपाणी नदीत आल्यावर  नदीतील जलचर मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नदीतील पाण्याला दुर्गंधी यायला लागल्यावर त्या त्या परिसरातील स्थानिक नागरिक आक्रमक होतात व प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेत प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी पहाणी दौरा करून, पाण्याचे नमुने घेतात. मात्र आज तागायत घेतलेल्या पाण्याचे नमुन्याचे निकाल काय होते हे लोकांच्या माहितीसाठी जाहीर केले जात नाहीत. तसेच  प्रदूषण करणार्‍या कंपनी विरोधात ठोस कारवाई ही  होत  नाही. त्यामुळे पाताळगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

पाताळगंगा नदीतील पाण्याचे नमुने घेऊन नियमितपणे प्रदूषणस्तर तपासणी होते. कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेची सतत तपासणी केली जाते. कंपनी किंवा कोणत्याही आस्थापनेकडून नदीत प्रदूषित सांडपाणी सोडल्याचे स्पष्ट झाल्यावर मंडळाकडून त्वरित कडक कारवाई केली जाते.

-सचिन आडकर, उप प्रादेशिक अधिकारी, रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळ

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply