पनवेल : वार्ताहर
बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणार्या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत.
पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारे प्राणी संरक्षण कार्यकर्ता फिर्यादी विजय निलकंठ रंगारे यांना पनवेल हद्दीत बेकायदेशिर कत्तलखाना चालविला जात असल्याची माहीती मिळाली. ती माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना दिली. त्यानुसार माळी यांनी याबाबतची माहिती परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, बीट मार्शल व इतर कर्मचारी यांच्या साथीने कच्छी मोहल्ला, पनवेल येथील नाल्याच्या बाजुला असलेल्या एका पडक्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता पोलिसांची चाहुल लागल्याने तेथुन तीन इसम अंधाराचा फायदा घेवुन नाल्यातुन पळुन गेले.
या घटनास्थळी दोन बैल कापलेल्या स्थितीत मिळुन आले म्हणुन पळुन जाणारे लोकांचा या भागात शोध घेत असताना एक बंदर रोडने आदील टॉवरकडे एक संशयित रिक्षा जात होती. तिचा पाठलाग केला असता त्यातील तीन व्यक्ती पुन्हा रिक्षातून उड्या टाकून पळुन गेले. पोलीस पथकाने रिक्षाचालक शफीक शकील कुरेशी यास रिक्षासह ताब्यात घेतले, पळुन जाणारे व्यक्ती अदनान इमरान अन्सारी, इमरान अन्सारी, फैजान अन्सारी सर्व रा. कच्छी मोहल्ला झोपडपट्टी, पनवेल हे असल्याची खात्री झाल्याने भा. दं. वि. कलम 379, 429, 268, 269,270,34 सह महा.पशू संवर्धन अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), (ब), 9 (अ) सह प्राणी क्रुरता अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ) प्रमाणे त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन फरार आरोपींचा तपास सुरू आहे.