म्हसळा : प्रतिनिधी
एमएससीआयटीच्या क्लासला गेलेल्या एका मुलीची छेड काढून लगट करण्याचा प्रकार म्हसळा पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी नराधमास अटक करण्यात आली आहे. म्हसळा शहरात एमएससीआयटीच्या क्लाससाठी देवघर कोंड येथील सुमारे 17 वर्षांची एक विद्यार्थिनी आली होती. क्लास बंद असल्याने ती दिघी नाक्यावर थांबली असता, तेथे असणार्या 32 वर्षीय विवाहित व एक मूल असलेल्या इसमाने या मुलीला हातवारे करीत तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुलीला इसमाच्या हावभावावरून संशय आल्याने तिने आरडाओरड केली. त्या वेळी दिघी नाक्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस देविदास कारखेले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित इसमाला तत्काळ पोलीस ठाण्यात नेले. आरोपीवर पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे करीत आहेत.