Breaking News

प्रचाराचा सोशल फंडा

लोकसभा महासंग्रामाच्या निमित्ताने राजकीय रण तापू लागले असताना उष्णतेचा पाराही चढू लागला आहे. तापमान चाळीशीच्या वर जाऊ लागल्याने प्रचार करताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होताना दिसते. अशा वेळी घरबसल्या एका क्लिकवर किंवा अगदी बोटाद्वारे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हे शक्य झाले आहे समाजमाध्यमे अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्समुळे.

काळ बदलला तशी प्रचाराची पद्धतही बदलली. पूर्वीच्या काळी भिंती रंगवून उमेदवाराचा प्रचार केला जायचा. अमुक अमुक यांनाच विजयी करा, तमुक चिन्हासमोरील बटण दाबून आपले बहुमूल्य मत द्या, अशा आशयाच्या मजकूराने सार्वजनिक भिंती रंगविल्या जात असल्याचे चित्र निवडणूक काळात पाहावयास मिळत असे. जोडीला कापडी फलकही असत. त्यानंतर बॅनरचा, होर्डिंगचा जमाना आला. आचारसंहितेच्या बडग्यामुळे पोस्टरबाजीला आळा बसला. आता प्रचाराचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणून समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील माहिती, अपडेट्स मिळत असतात. यातील किती मेसेज खरे आणि किती फेक हा भाग वेगळा, पण याद्वारे सारेकाही सहजपणे उपलब्ध होत असल्याने या माध्यमाला पहिली पसंती दिली जाते.

याआधी संगणकापुरते मर्यादित असलेले इंटरनेटरूपी महाजाल गेल्या काही वर्षांत लॅपटॉप, आयपॅड असा प्रवास करीत थेट मोबाईलपर्यंत पोहचले. हल्ली जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आढळतो. जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच इंटरनेट असलेला मोबाईल हीसुद्धा अलीकडे एक गरज बनली आहे. याचे कारण मोबाइलद्वारे सर्वांशी संपर्क साधता येतोच, शिवाय त्यात सोशल नेटवर्किंग साईट्स, अ‍ॅप डाऊनलोड करून धकाधकीच्या जीवनात स्वत:ला ‘रिफ्रेश’ही ठेवता येते. मनोरंजनाचे हे फार मोठे साधन बनले आहे. चॅटिंग, ऑनलाइन गप्पा, विनोद एवढ्यावरच न राहता सोशल जग एव्हाना चांगलेच विस्तारले असून, सोशल मीडिया अशी त्याची नवी ओळख तयार झाली आहे.  

सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेऊन गेल्या लोकसभा निवडणुकीत या माध्यमाचे वारे वाहू लागले. तेव्हाचा विरोधी पक्ष भाजपने याचा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसविरोधात जोरदार वापर केला आणि त्यास जनतेने प्रतिसादही दिला होता. यंदाच्या निवडणुकीत तर सोशल मीडिया हे प्रचाराचे अविभाज्य अंग बनले आहे. नेमके हेच लक्षात घेऊन यंदा सर्वच राजकीय पक्षांनी या डिजिटल प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी गाठीभेटी, रॅली, सभा असे पारंपरिक मार्ग अवलंबित आहेत. त्याचप्रमाणे ते सोशल प्रचाराद्वारे मतदारराजाला साद घालत आहेत. यासाठी राजकीय पक्षांचे विशेष सेलही कार्यरत आहेत; तर खासगी एजन्सीजनासुद्धा चांगली मागणी आहे.

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात गेल्या काही दशकांपासून तरुणाईची संख्या वाढली आहे. देशातील हे युवक-युवती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असतात. या नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले असून, त्यांना भावतील अशा गोष्टींतून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सोशल प्रचारामध्ये प्रामुख्याने दोन ट्रेण्ड दिसून येतात. एक म्हणजे आपल्या उमेदवाराला फायदा होईल अशा इमेज, व्हिडीओ तयार करून पोस्ट करायच्या. यातून आपला उमेदवार कसा चांगला आहे, त्याने किती काम केले आहे, हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे विरोधकांचा नकारात्मक प्रचार. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुका शोधून त्या ‘व्हायरल’ करण्यावर हल्ली भर दिसून येतो. अनेकदा राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींवरून ‘ट्रोल’ होत असतात. मग त्यांच्यावर विनोदी मिम्सही तयार केले जातात, ज्याला नेटीझन्सकडून चांगलीच पसंती मिळते.

खरी मजा तेव्हा येते जेव्हा एखाद्या पोस्टवरून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येतात. सर्वसाधारणपणे सोशल मीडियात दोन मतप्रवाह दिसून येतात. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांचा आणि दुसरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची बाजू उचलून धरणारा. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर सत्ताधार्‍यांच्या फेव्हरमध्ये एखादी पोस्ट आल्यावर विरोधक ती खोडून काढण्याचा प्रयत्न करतात; तर कुणी विरोधकांची खिल्ली उडविल्यावर त्यांचे समर्थक खवळतात. नाही म्हणायला काही त्रयस्थ किंवा अन्य पर्याय चोखाळणारेही असतात, जे वस्तुस्थितीच्या बाजूने जाणारे असतात, परंतु कुणीही कितीही म्हटले तरी प्रत्येकाच्या मनात एखादा पक्ष, नेत्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर हा असतो, जो सोशल मीडियातून कळत-नकळत समोर येतो. असो!

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा केवळ निवडणुकीच्याच नव्हे; तर इतर वेळीही वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: कुणाचे चारित्र्यहनन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; अन्यथा वादग्रस्त पोस्टवर पोलिसांचीही नजर आहे. तेव्हा सोशल साईट्सवर लाईक, शेअर, कमेंट करताना सावधान! अगदीच साध्या, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चांगल्याचे स्वागत आणि आक्षेपार्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

इथेही आचारसंहिता लागू

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक घोषित करताना निवडणूक आयोगाने सोशल मीडियाबाबत लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली. त्यानुसार सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जाणार्‍या जाहिरातीही उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडिया कंपन्यांना त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार असून, उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून प्रसारित केल्या जाणार्‍या मजकुरालाही आचारसंहितेचे बंधन असणार आहे. उमेदवारी अर्जामध्ये प्रत्येक उमेदवाराला आपल्या सोशल मीडिया खात्यांची माहितीही देणे आवश्यक आहे.

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply