Breaking News

कोरोना काळात पत्रकारांचेही कार्यही महत्त्वपूर्ण -प्रवीण दरेकर

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जीवंत आहे. पनवेल मिडिया प्रेस क्लबने पत्रकार दिनानिमित्त साधून कोरोनाच्या संकटात समाजाला साथ देणार्‍या समाजसेवकांचा सत्कार केला. कर्तृत्ववानांचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपण्याचे काम पनवेल मीडिया प्रेस क्लबने केले आहे, असे उद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. कोरोना काळात कोविड योद्ध्यांप्रमाणेच पत्रकारांचे कार्यही महत्त्वपूर्ण ठरले, असेही त्यांनी सांगितले. पनवेलमधील सुरूची हॉटेलच्या सभागृहात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या संकटकाळात समाजातील गरजूंना मदत केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सुनील पोतदार, पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दरेकर यांनी सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करताना राज्यात पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. आणीबाणीच्या काळात ज्याप्रमाणे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यात आली, त्याप्रमाणे सध्या काही प्रमाणात परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. पत्रकार सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे पत्रकारांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मी रायगडच्या मातीतला माणूस म्हणून या कार्यक्रमाचे मला विशेष कौतुक आहे. पत्रकारांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजाला दिशा देणारा आहे. नव्या पिढीला प्रोत्साहन देणारा, प्रेरणा देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सत्कामूर्ती डॉ. गिरीश गुणे यांनी भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था, डॉ. गिरीश गुणे, डॉ. नागनाथ यमप्पल्ले, डॉ. साजिद खान, डॉ. आरिफ दाखवे, डॉ. अरूणा पोहरे, दीपक सिंग, संतोष ठाकूर, श्री. भगवती साई संस्थान, सचिन दुंदरेकर, शिवसहाय्य संस्था पनवेल, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, एकता सामाजिक संस्था आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

तुम्ही समाजात केलेल्या कामामुळे आपण सगळे मिळून कोरोनावर मात करू शकलो. नागरिकांनी प्रत्येकाची जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले. प्रत्येकाने सुरक्षितता बाळगल्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात कोरोनावर मात करू शकलो.

-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply