आयपीएलमध्ये सहा हजारधावांचा टप्पा पार
मुंबई ः प्रतिनिधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने 196 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला असून, यात पाच शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 51 धावा केल्यानंतर विराटच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत त्याने 196 सामन्यांत सहा हजार 21 धावा केल्या आहेत. कोहलीने 38.35च्या सरासरीने आणि 130.69 स्ट्राइक रेटने हे लक्ष्य गाठलेे.
आयपीएलमध्ये सर्वांत जास्त धावा करण्यार्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना दुसर्या स्थानावर आहे. त्याने 197 सामन्यांत 33.21च्या सरासरीने पाच हजार 448 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने आयपीएलमध्ये सर्वांत आधी पाच हजारांचा टप्पा गाठला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिखर धवन या यादीत तिसर्या स्थानावर आहे. त्याने 180 सामन्यांत 35.01च्या सरासरीने पाच हजार 428 धावा केल्या आहेत, तर सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 146 सामन्यांत पाच हजार 384 धावा केल्या आहेत. मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 204 सामन्यांत 31.39च्या सरासरीने पाच हजार 368 धावा केल्या आहेत.
दरम्यान, टी-20 सामन्यात तीन खेळाडूंनी आतापर्यंत 10 हजारांचा पल्ला गाठला आहे. यात वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याने 13 हजार 796 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतके आणि 86 अर्धशतकांचा समावेश आहे.