नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचे महत्त्वाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या 14व्या मोसमात खेळत आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही परतण्याच्या विचारात आहेत, मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घरी परतण्यास नकार दिला आहे.
न्यूझीलंडच्या खेळाडूंना सध्या भारतातच राहायचे असून, ते येथूनच इंग्लंडला रवाना होतील. न्यूझीलंडला 2 जूनपासून इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर ते 18 जूनपासून भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत. कर्णधार केन विल्यमसन, वेगवान गोलंदाज काइल जेमीसन आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह मिशेल सँटनरही न्यूझीलंडच्या कसोटी संघात दाखल होणार आहेत. सध्या हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हीथ मिल्स यांनी सांगितले, आम्हाला कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणारे खेळाडू मिळाले आहेत. ते घरी येऊ शकत नाहीत किंवा दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइनमध्ये राहू शकत नाहीत. म्हणून ते राऊंड-रॉबिन किंवा अंतिम मालिका पूर्ण होईपर्यंत तिथे असणार आहेत.
भारतात उपस्थित असलेल्या खेळाडू, सदस्य आणि प्रशिक्षक कर्मचार्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. आयपीएलमध्ये सध्या न्यूझीलंडचे 10 खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे सात सदस्य आहेत. आतापर्यंत कोणालाही घरी परत यायचे आहे, असे कोणतेही संकेत आम्हाला मिळालेले नाहीत. या कठीण काळात न्यूझीलंडला परत जाणे फार अवघड आहे, पण भारतातील बायो बबल सुरक्षित आहेत. आम्हाला विश्वास आहे की, बीसीसीआय ही बाब गांभीर्याने घेईल, असेही मल्स यांनी म्हटले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …