आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक
पेण : प्रतिनिधी
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींवर प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी अशी मागणी पेण येथील मूर्तिकारांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांची शनिवारी (दि. 17) बैठक झाली.
या बैठकीस आमदार रविशेठ पाटील, महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, हमरापूर मूर्ती संघटनेचे अध्यक्ष कुणाल पाटील, सरपंच बाळा म्हात्रे, अरविंद पाटील, कैलास पाटील, दीपक समेळ आदी पदाधिकारी व मूर्तिकार उपस्थित होते.
या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की, मूर्तिकारांवर आजच्या घडीला जी वेळ आली आहे याबाबत मी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर याच्याशी पत्रव्यवहार केला असून, संपूर्ण महाराष्ट्रात पीओपीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या विषयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांच्याकडे आपले शिष्टमंडळ नेऊन पीओपीवरील बंदी उठविण्याची मागणी करू.