चिरनेर : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील गावोगाव भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. गावागावातील गल्लोगल्ली या भटक्या कुत्र्यांनी आपली दहशत निर्माण केली असल्याने कोणी त्यांना छेडले असता ही कुत्री त्या व्यक्तीवर तत्काळ आक्रमण करीत आहेत. चिरनेर येथील आदिवासी वाडीवरील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यावर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून त्याच्या डोक्यावर करकचून चावा घेतल्याने हा चिमुरडा रक्तबंबाळ झाला. मात्र त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने या चिमुरड्याचे प्राण वाचले आहे. परिणामतः या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे.
उरण शहर व ग्रामीण विभागात सध्या भटक्या कुत्रांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे. उकिरड्यावर टाकलेल्या खरकट्या अन्नावर ही मोकाट कुत्री आपली गुजराण करीत असतात. तेथेच त्यांची पैदास वाढून त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. झुंडीने राहणार्या या मोकाट कुत्र्यांच्या गटांमध्ये अनेकवेळा भांडणे होतात त्यामुळे आक्रमक झालेले हे मोकाट कूत्रे एखादे लहान मूल किंवा महिला दिसली की त्यांच्यावर लगेच हल्ला करतात.त्यामुळे अलिकडच्या काही दिवसात कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जायबंदी झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी चिरनेर येथील आदिवासी वाडीतील सुजित जनार्दन कातकरी हा मुलगा आपल्या पालकांसह चिरनेर गावात येत असताना रस्त्यावर असलेल्या एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्याची गंभीर स्थिती बघून निसर्गमित्र, सामाजिक कार्यकर्ते महेश भोईर व सुयश म्हात्रे यांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी कोप्रोली येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन नंतर उरण येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याच्या गंभीर घावांवर योग्य उपचार करण्यासाठी मुंबईतील जे जे रूग्णालयात न्यावे लागले. जे जे रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने या बालकाला जीवदान मिळाले आहे. मात्र या मोकाट कुत्र्यांची दहशत मोडण्यासाठी त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.कुत्र्यांचे निरबीजिकरण केल्यास मोकाट कुत्र्यांची पैदास कमी होऊन त्यांची संख्या काही दिवसात कमी होईल असे मत निसर्गमित्र महेश भोईर यांनी व्यक्त केले आहे. तसेच कुत्रा पाळणार्या शौकिनांनी कुत्र्यांना मोकाट न सोडता बंदिस्त ठेवले तरी ही समस्या कमी होईल असे प्राणीमित्र आनंद मढवी यांनी नमूद केले आहे.