Breaking News

उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण बंद

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर तेथे लसीकरणासाठी नागरिकांची दररोजच गर्दी होत होती. हे उपजिल्हा रुग्णालय शहराच्या मधोमध असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी सोयीचे होते, मात्र तेथील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्जत शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून लसीकरणासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्य केंद्रांवर जाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीपासून लसीकरण केंद्र सुरू होते. सुरुवातीला आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिक्षक, शासकीय अधिकारी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येत होते. सुरुवातीला भीतीपोटी कमी गर्दी होत होती, मात्र लसीकरणाचे महत्त्व कळल्यानंतर गर्दी होऊ लागली. याच उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर तळमजल्यावर लसीकरण सुरू होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपचारासाठी कमी रुग्ण होते, मात्र दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या सातत्याने वाढू लागल्याने रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या.

त्यातच रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना भेटून सतत त्याच परिसरात वावरतात. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने हे लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी होऊ लागली. त्या मागणीनुसार तेथील लसीकरण केंद्र हलवून रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या इमारतीत सुरू करण्यात आले आणि तेथे जाण्यासाठी मागील बाजूकडील प्रवेश खुला करण्यात आला. त्यामुळे लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांची भीती कमी झाली. तेथे लस उपलब्ध असताना लसीकरण योग्य प्रकारे सुरू होते. काही कारणामुळे लसीकरण न झाल्यास नागरिकांना परतावे लागत असत.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केल्याने जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने व दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णसंख्येचा विचार करता सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहेत. अशा ठिकाणी यापुढे लसीकरण राबवता येणार नाही. त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. यापुढे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर तत्काळ कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्याने कर्जत शहरातील नागरिकांना आता ग्रामीण भागात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागणार आहे.

दरम्यान, कर्जत शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र नाही. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी वेळ व खर्च होणार असून मनस्तापसुद्धा होणार आहे. तसेच ज्येष्ठ व अपंग नागरिकांची परवड होणार आहे. याचा विचार करून कर्जत नगर परिषद प्रशासनाने एक-दोन योग्य जागांची निवड करून तेथे ठेका पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्स यांची नियुक्ती करून लसीकरण केंद्र सुरू केल्यास नागरिकांची चांगली सोय होऊ शकते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply