मोहोपाडा : प्रतिनिधी
चांभार्ली येथील पाताळगंगा नदीत पोहायला गेलेल्या तिघांना जलचर प्राण्याने चावा घेतल्याची घटना घडली असून, यात ते जखमी झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे कोंडी परिसरात गावातील रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण गेले होते. या वेळी पाताळगंगा नदीत पोहत असताना या तरुणांची नजर एका जलचर प्राण्यावर पडली. पाण्यात बुडणारे ते कुत्र्याचे पिल्लू असावे असा त्यांनी अंदाज बांधला व त्याला वाचविण्याकरिता रजत, जय व सौरभ तिघे त्याच्याजवळ पोहोचले, मात्र या जलचराने पायाला चावा घेऊन त्यांना जखमी केले.
पोहायला जाणे टाळा!
पाताळगंगा नदीच्या पाण्यातील हा मुंगूसासारखा दिसणारा व चावा घेणारा प्राणी कोणता असावा याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकर्यांना व जाणकारांना विचारले असता, त्यांनी त्याचे नाव उद असे असल्याचे सांगितले. हा जलचर अचानक हल्ला करतो. तो पाताळगंगा नदीत कुठून व कधी आला याचा कोणालाच पत्ता नाही. या पार्श्वभूमीवर पाताळगंगा नदीत पोहायला जाऊ नये तसेच सावधानता बाळगावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.