Breaking News

उद्धवा, अजब तुझा कारभार!

रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता, असे इतिहासकार सांगतात. तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असताना राजा म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होत असताना अखेर त्यांनी पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा वरुणराजाने राज्याला जोरदार तडाखा दिला आहे. सुरुवातीला अनियमित बरसणार्‍या पावसाने जाता जाता अक्षरश: होत्याचे नव्हते केले. विशेषकरून जे दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात तेथे पूर आला इतका पाऊस पडला. परतीच्या पावसाचा सर्वाधिक तडाखा प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि कोकणाला बसला. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्ते, घरे, शेत असे सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस पडत होते. आधीच जनता कोरोनामुळे त्रस्त आहे. त्यातच निसर्गाची अवकृपा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या अस्मानी संकटाने बळीराजा तर पुरता हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने पुढे करायचे काय या विवंचनेत तो आहे. प्रजा बिकट परिस्थितीत असताना राजाने आधार देणे आवश्यक असते, मात्र राजाचा कारभार भयंकर आहे. त्यामुळे राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची याचा विदारक अनुभव शेतकर्‍यांसह राज्यातील समस्त जनता सध्या घेत आहे. मुख्यमंत्री महोदय कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडायला तयार नाहीत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर सीएम उद्धव ठाकरे जनतेचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आलेले नाहीत. इतका असंवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर झालेला नसेल. इतर नेते अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जात असल्याने ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने अखेर त्यांनी सोलापूरचा पाहणी दौरा जाहीर केला आहे, पण नुसता दौरा करून चालणार नाही तर ओला दुष्काळ जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. मागच्या सरकारच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राची मदत येण्याची वाट न पाहता शेतकर्‍यांना तातडीने मदत म्हणून प्राथमिक 10 हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही ही मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी 25 ते 50 हजार रुपये मदत द्या, शेतकर्‍यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या असा सूर तेव्हाचे विरोधक व आताच्या सत्ताधार्‍यांनी लावला होता. आता ही मंडळी सत्तेत आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे. आता बघूया ही मंडळी किती मदत देतात? की संपूर्ण बिनशर्त कर्जमाफी करतात ते? कसलं काय? पाहणी, पंचनामे करण्याआधीच यांनी केंद्र सरकारकडे मदतीसाठी बोट दाखविले आहे. स्वत: काय देणार ते मात्र सांगितलेले नाही. राजा असा तर त्याचे सहकारीही त्यांच्यासारखेच. महाविकास आघाडी सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही. तिघांची तोंडं तीन दिशेला असलेले हे सरकार आहे. त्यामुळे राज्याचा काय विकास होणार आणि काय कुणाला दिलासा मिळणार. उलट यांच्या अजब कारभारामुळे राज्य अनेक वर्षे मागे गेले आहे. शेतकरी, कामगार, मच्छीमार असो वा इतर घटक सारी प्रजा त्रस्त असून, राजा आणि त्यांचे सहकारी मात्र आपल्याच विश्वात मश्गूल आहेत. राज्याची परिस्थिती पाहून तरी त्यांनी भानावर यावे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply