नवी मुंबई : बातमीदार
एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी उद्या सोमवार (दि. 8)पासून ई पासची आवश्यकता लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे ई पासच्या त्रासातून आता नवी मुंबई करांची सुटका झाली आहे.
केंद्र सरकारने अनलॉक 1.0 ची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन शिथील करण्याच्या दिशेने पाऊल उचलत मिशन बिगीन अगेनची घोषणा केली. यामध्ये 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये असलेले लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये आता पुन्हा एक नवीन बदल करण्यात आला असून येत्या 8 तारखेपासून ई पासची गरज भासणार नाही. एमएमआरमधल्या प्रवाशांना पासची असलेली अट काढून टाकण्यात आल्यामुळे आता विशेषत: नवी मुंबईतून कामानिमित्ताने मुंबईकडे येणार्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकर हे मुंबई, ठाणे येथे कामानिमित्त व रोजगारनिमित्त जाऊ शकणार आहेत. तर दुसरीकडे ई पासची गरज लागणार नसल्याने पोलिसांवरचा ताण देखील कमी झाला आहे.
कोरोनाच्या संकटात नागरिकांना घरात बसवण्यापासून ते नागरिकांवर निगा राखणे, तसेच वाहनांची तपासणी व सोबत ई पास, मजुरांसाठी विभागनिहाय पास देणे अशी अनेक कामांची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली होती. त्यात अनेकदा ई पास ची सुविधा माहीत नसल्याने नागरिक स्थानिक पोलीस स्थानकात फोन करून व हेलपाटे मारत होते. नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तरे देताना पोलिसांची दमछाक होऊ लागली होती. त्यामुळे एमएमआर क्षेत्रात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ई पासची गरज लागणार नसल्याने पोलिसांवरचा मोठा ताण कमी झाला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईकरांसाठी देखील हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
मुंबई व लगतच्या ठाणे परिसरात नवी मुंबईतून मोठा वर्ग रोजगारनिमित्त जा-ये करत असतो. त्यात सध्या लॉकडाऊनमुळे मुंबईत जाण्यासाठी ई पासची गरज लागत आहे. तर सरकारने अनलोक जाहीर केल्यामुळे विविध कंपन्यांकडून कर्मचार्यांना कामानिमित्त बोलावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक ई पास कसा मिळेल या चिंतेत आहेत. त्यात पगार कपातिची धास्ती नागरिकांना असल्याने उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे नागरिक आता कोणताही धोका पत्करून नोकरी धंद्यावर जाण्यासाठी तयार आहेत. ई पासची चिंता भेडसावत असल्याने त्यांची पंचाईत होत होती. मात्र शासनाने एमएमआर क्षेत्रातील महापालिकांना ई पासची गरज 8 जूनपासून लागणार नसल्याचे जाहीर केल्याने नवी मुंबई पोलीस व नागरिक या दोहोंवरचा ताण उतरला आहे.