पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणारे तीन कारखाने बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे. तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून रात्री हवेत विनाप्रक्रिया सोडण्यात येणार्या वायूमुळे खारघरमधील नागरिकांना श्वसन आणि इतर आजारांचा धोका जाणवत होता. प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली होती. नगरसेविका पाटील यांच्या मागणीपत्राची दखल घेऊन 9 ते 10 ऑक्टोबरदरम्यानच्या रात्री प्रदूषण नियंत्रण महामंडळ कर्मचार्यांनी केलेल्या पाहणीत मे. स्टार फिश मरिन, मे. अल्फाईझन आणि मे. ग्लोबल मरिन या तीन कारखान्यांतून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे कारखाने बंद करण्यात आले आहेत, अशा आशयाचे पत्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकार्यांनी नगरसेविका पाटील यांना पाठविले आहे.