Breaking News

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

अलिबाग : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे बुधवारी घरोघरी आगमन झाले. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रायगड जिल्हयात एक लाखांहून अधिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि चैतन्य सोहळयाला प्रारंभ झाला. दरम्यान दीड दिवसांच्या गणपतींचे गुरूवारी मोठ्या भक्तीभावाने वाजतगाजत विसर्जन करण्यात झाले.
घरोघरी बुधवारी सकाळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशांची शोडषोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती पार पडली. पूजा सांगण्यासाठी भटजींची धावपळ सुरू होती. गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी मोठ्या संख्येने गावागावात दाखल झाले आहेत. त्यामुळे एरव्ही शांतता असलेल्या गावांना जाग आली आहे. बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र उत्साह संचारला असून वातावरण भारून गेले आहे. रात्री नाचगाण्यांच्या कार्यक्रमात चाकरमानी आणि ग्रामस्थ दंग झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्येही गजबज सुरू आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीकरिता कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे.
दीड दिवस गणेशांची मनोभावे पूजा केल्यानंतर गुरूवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वाजत गाजत गुलाल उधळीत बाप्पांच्या मिरवणूका निघाल्या. या मिरवणुकांमध्ये भक्त धुंद होवून नाचत होते. ग्रामीण भागात नदी, तलाव तसेच समुद्रात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सवाच्या उत्साहात खंड पडला होता. कोकणात धुमधडाक्यात साजरा होणारा हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता, मात्र यंदा कोरोनामुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. मुंबई, पुणे, सुरत या भागात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी गावी येत असतात. यंदा या उत्सवासाठी येणारया चाकरमान्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply