अलिबाग : प्रतिनिधी
परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सलग तीन वर्षे जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सन 2018मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली होती. 2019-20मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 27 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले होते. या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 16 हजार हेक्टरहून अधिक भातशेती संकटात सापडली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्ह्यात दरवर्षी एक लाख पाच हजार हेक्टर भात पिकाची लागवड केली जाते. यंदा 95 हजार हेक्टरवर यंदा भाताची लागवड करण्यात आली होती. जून आणि जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडला, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भातपीक जोमात आले होते. यंदा जिल्ह्यातील भाताचे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा शेतकर्यांना तसेच कृषी विभागाला होती, मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक नष्ट झाले आहे.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील 16 हजार हेक्टरवरील भातशेतीला या पावसाचा तडाखा बसला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. -पांडुरंग शेळके, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड