Sunday , October 1 2023
Breaking News

काशिद किनार्‍याला पर्यटकांची प्रतीक्षा

मुरूड : प्रतिनिधी

पर्यटकांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा काशिद समुद्रकिनारा लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुना सुना झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या किनार्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी सुरूची झाडे स्टॉलवर पडल्याने स्थानिक स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटांवर मात करीत येथील काही स्टॉलधारकांनी बुधवार (दि. 21)पासून आपले स्टॉल सुरू केले, मात्र त्यांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.

काशिद या पर्यटनस्थळावर देशी, विदेशी पर्यटकांची  नेहमीच मोठी गर्दी दिसून येते. विस्तीर्ण असा निळाशार समुद्र व स्वच्छ, सुंदर किनारा, सुरूच्या बागा यामुळे वर्षाला 10 लाखांपेक्षा जास्त पर्यटक काशिद समुद्रकिनार्‍याला भेट देत असतात. या समुद्रकिनार्‍यावर 64पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत. तेथे माफक दरात खाद्यपदार्थ व शीतपेयांची विक्री करून स्थानिक स्टॉलधारक अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत असतात.

मात्र या वर्षी लॉकडाऊनमुळे पर्यटनाचा उन्हाळी हंगाम कोरडा गेला. त्यामुळे स्थानिक हॉटेल्स, लॉजिंग व खानावळ तसेच स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता लॉकाडाऊनचे नियम शिथिल केल्याने काशिद समुद्रकिनार्‍यावरील स्टॉलधारकांनी बुधवारपासून स्टॉल्स सुरू केले आहेत, मात्र पर्यटक नसल्याने स्टॉलधारक चिंतेत आहेत.

काशिद समुद्रकिनार्‍यावर सध्या वाळूत चालणार्‍या गाड्या, घोडेस्वारी सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र स्थानिक व्यावसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.

निसर्ग चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे काशिद समुद्र किनार्‍यावरील स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही स्टॉल्स सुरू झाले आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व स्टॉल्स उघडण्यात येणार आहेत. पर्यटकांनी काशिद समुद्र किनार्‍याला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा.

-रमेश कासार, स्टॉलधारक, काशिद, ता. मुरूड

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply