Breaking News

द्रुतगती महामार्गावर टँकर पेटला

दुसर्‍या अपघातात दोघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणार्‍या टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मुंबईहून पुण्याला जाणारा टँकर (आरजे-18, जीबी-51 49) गुरुवारी बोरघाट चढत असताना टँकरच्या केबिनने अचानक पेट घेतला. त्यात टँकर आगीच्या विळख्यात सापडला. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी गस्त पथक, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.  अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारत आगीवर नियंत्रण मिळविले. केबिनला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने टँकर बाजूला उभा करून तो  बाहेर पडला. त्यामुळे जीवितहानी टळली. पहाटेच्या सुमारास महामार्गावर वाहनांची संख्या कमी असल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर गुरुवारी (दि. 22) पहाटे दुसरा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने चाललेल्या कंटेनरला (एमएच-46, एफ-6034) अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार ठोकर दिली. त्यामुळे कंटेनर उलटला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र अद्याप जखमींची नावे समजली नाहीत.

Check Also

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील …

Leave a Reply