Breaking News

मुरूडमध्ये भाज्यांचे दर कडाडले

मुरूड : प्रतिनिधी

अवकाळी पावसाने मुरूड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, अतिपावसामुळे भाजीचे पीकदेखील नष्ट झाले आहे. दरम्यान, आवक घटल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहकांच्या महिन्याच्या खर्चातही वाढ झाली आहे.

मुरूड तालुक्यात अवकाळी पाऊससुद्धा दिवसाला 130 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला. या अतिपावसात शेतकर्‍यांनी लावलेले भाजीचे पीक नष्ट झाले. त्यातच वाशी, पेण, वडखळ येथून होणारी भाज्यांची आवक 50 ते 60 टक्क्यांनी घटल्याने मुरूडच्या बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी भेंडीचा दर सध्या 80 रुपयांवर गेला आहे, तर वांग्यांनी 40वरून 80 रुपयांवर झेप घेतली आहे. भरपूर ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या टोमॅटोच्या दरामध्येही 20 रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात अधिक भाव खाणारा फ्लॉवर 100 रुपयांवर पोहचला आहे. त्याच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी 40 रुपये किलोने मिळणारी कोबी आता 80 रुपये किलो झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीचे दरही कडाडले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची एक जुडी 40 ते 50 रुपये दराने विकली जात आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्यामुळे मुरूड बाजारपेठेतही कांदा आणि बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे.

सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने बहुसंख्य भाविकांचे  उपवास सुरू आहेत. अशा वेळी भाज्यांचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना महागाईच्या दरात भाजी खरेदी करावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत भाज्यांच्या दरात वाढ होत असल्याने गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शाकाहारी लोकांना भाज्यांशिवाय पर्याय नाही. सध्या भाज्या महागल्यामुळे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले असून, शासनाने यावर लवकर नियंत्रण आणले पाहिजे.

-सुलभा जाधव, गृहिणी, मुरूड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply