Breaking News

झेंडूला सोन्याची झळाळी!

शेतकरी मात्र लाभापासून वंचित; कोरोनामुळे फूलशेतीकडे पाठ

पाली ः प्रतिनिधी – दसर्‍यानिमित्त पाली सुधागडसह जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी बरसलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे स्थानिक शेतकर्‍यांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.

दसर्‍याच्या दिवशी 120 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने झेंडूला मागणी होती. झेंडूला मागील वर्षी 80 ते 100 रुपये प्रतिकिलोचा भाव होता. अनेक जण सण, उत्सव डोळ्यांसमोर ठेवून भाजी, फुले व फळांचे उत्पादन घेतात, मात्र यंदा उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी हताश झाल्याचे दिसत आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी सांगितले की, गुढीपाडव्याला झेंडूचे चांगले उत्पादन काढले होते, मात्र त्याच वेळी कोरोनाची साथ आली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी झेंडूला उठावच मिळाला नाही.

त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर दसर्‍यालादेखील अशी परिस्थिती उद्भवू शकेल, या भीतीने झेंडूची शेती केली नाही, असेही तुषार केळकर यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊन बहुतांशी शिथिल असल्याने दसर्‍यानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आपोआपच झेंडूलादेखील मागणी वाढल्याचे दिसून आले.

अवकाळी पावसामुळे झेंडूच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्‍यांनी यंदा झेंडूची फारशी लागवड केली नाही. परिणामी झेंडूला मागणी असूनही उत्पादन कमी आणि दूरच्या बाजारातून आणावे लागत असल्याने यंदा भाव वधारला आहे.

-राजू फोंडे, फूलविक्रेते, पाली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply