दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे सैन्य आपल्या जमिनीच्या एक इंचही भूभागावर कोणाला कब्जा करू देणार नाही, याची खात्रीही त्यांनी देशवासीयांना दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या दोन दिवसीय दौर्यावर असून तेथील युद्ध स्मारक व सैन्य दलास त्यांनी भेट दिली. सुकना युद्ध स्मारक येथे जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली, तसेच सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर तेथील शस्त्रांचे पूजन करून भारतीय सैन्याला प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांनी केले. या वेळी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हेदेखील उपस्थित होते.