Breaking News

माणगाव आणि मुरुडमधील शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

माणगाव : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड  नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. महसुल व कृषि विभागाने या नुकसानीचे पंचनामे केले असून, शेतकर्‍यांचे डोळे आता नुकसानभरपाईकडे लागले आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही. पाण्याखाली राहिल्याने शेतातील भातपीक पूर्णतः कुजले. वरकस जमिनीवरील नाचणी, वरी ही पिकेही वाहून गेली. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, राज्य शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यातून होत होती. तसेच बाधीत शेतकर्‍यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपनेही लावून धरली. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे झाले खरे, पण आता नुकसानग्रस्त शेतकर्‍याना शासनाच्या भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे.

माणगाव तालुक्यातील 187गावातील 8343 शेतकर्‍यांच्या एकूण 2139.3 हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचे तर 23.38 हेक्टरवरील नाचणी पिकाचे नुकसान झाले आहे. बाधीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 147.06 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आता ही नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळणार, याकडे माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत.

मुरुड : प्रतिनिधी

तालुक्यात परतीच्या पावसाने कापणीला तयार असलेल्या भाताचे प्रंचड नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. बाधीत शेतकरी तसेच भाजपने केलेल्या मागणीनंतर कसेबसे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, आता बळीराजाला नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे.

जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मालमत्तेचीही हानी झाली आहे. त्यानंतर कोसळलेल्या परतीच्या पावसात  भाताचे हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाल्याने मुरूड तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मुरुड तालुक्यात 3210 हेक्टर भात लागवड क्षेत्र असून, परतीच्या पावसाने 66  गावातील 3351  शेतकर्‍यांचे 1063 हेक्टर वरील भात पिक बाधित झाले आहे. तालुक्यात सुमारे एक कोटी सहा लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसिलदार गमन गावित यांनी दिली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply