नऊ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त, वन विभागाकडून तिघांवर कारवाई
मुरुड : प्रतिनिधी
खैराच्या लाकडांची तस्करी करणार्या तीन आरोपींवर मुरुड वन विभागाने गुरुवारी (दि. 29) कारवाई करून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणार्या बॅलेरो गाडीसह सुमारे नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात साग, निलगिरी, खैर असे अनेक वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. या झाडांची चोरून तोड करून, तस्करी करणार्यांना पकडण्याची मोहीम मुरुड वन विभागाने हाती घेतली आहे. हेल्प लाईनवरून मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रण निर्मुलन पथकाचे वनक्षेत्रपाल व फिरत्या पथकाचे प्रमुख रोहा इशांत कांबळी यांनी गुरुवारी ताबंडी चेक नाक्यावर सापळा रचून खैराच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणारी बॅलेरो पिक गाडी (एमएच-06,बीडब्लू-0143) पकडली. या गाडीत खैराच्या लाकडाचे सोलीव 40 नग होते.
या प्रकरणी कृपेश चव्हाण (रा. राणेचीवाडी), नीरज जयस्वाल (गाडी चालक) आणि अमित शेळके (रा. आदाड) यांनी वन विभागाने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय वन अधिनियमन 1927 चे कलम (26)(1)(फ)42)(43) अन्वये करवाई करण्यात आली आहे. तसेच खैराच्या लाकडाचे 40नग आणि त्यांची वाहतूक करणारी बॅलेरो पिक गाडी असा एकूण नऊ लाख आठ हजार 341रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वनक्षेत्रपाल इशांत कांबळी याच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनरक्षक अजिंक्य कदम, सचिन मानकर, सुशिला गोरड, गोविद माळी, वनपाल विजय कोसबे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल इशांत कांबळी करीत आहेत.