Tuesday , March 21 2023
Breaking News

महिला आरोग्य अधिकार्याची गोळ्या घालून हत्या

पंजाब ः प्रतिनिधी : पंजाबच्या खरड भागात वरिष्ठ महिला आरोग्य अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची त्यांच्या कार्यालयात घुसून एका व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकर्‍याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार अधिकारी नेहा शौरी यांची खरडमध्ये अन्न प्रयोगशाळेत नियुक्ती होती. त्याचबरोबर त्यांच्यावर मोहाली येथील रोपड जिल्ह्यासाठी अन्न व प्रशासन विभागाचा परवाना देण्याची जबाबदारी होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोरिंडाचा रहिवासी असलेला आरोपी बलविंदर सिंह डॉ. नेहा शौरी यांच्या कार्यालयात घुसला आणि आपल्या परवानाधारी बंदुकीतून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात कळते की, आरोपी मोरिंडामध्ये एका औषधाचे दुकान चालवत होता. दरम्यान, 2009 मध्ये नेहा यांनी त्याच्या दुकानावर छापा मारला होता, तसेच या दुकानातून बंदी असलेली नशेची औषधे जप्त केली होती. त्यानंतर या दुकानाचा औषध परवाना रद्द करण्यात आला होता. या हत्याकांडाचे निश्चित कारण समजू शकले नाही, मात्र परवाना रद्द करण्यात आल्यानेच हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबचे पोलीस महानिरीक्षक दिनकर गुप्ता यांना या महिला अधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी चौकशी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply