Thursday , March 23 2023
Breaking News

उमेदवाराचा पत्ता नाही, पण काँग्रेसची प्रचाराची घाई

पुणे ः प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन अनेक राजकीय पक्षांचे उमेदवारही ठरले. प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली, मात्र काँग्रेससारख्या इतकी वर्षे जुना असलेल्या पक्षाला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार सापडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मतदानाची तारीख जवळ आली, इतर पक्षांच्या विरोधी उमेदवारांचे अर्जदेखील दाखल झाले, तरीही पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही.

पुणे शहर काँग्रेस कार्यालयात जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारही सुरू केला आहे, मात्र पक्षाचा उमेदवार कोण, हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. अरविंद शिंदे, सुरेखा पुणेकर, तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाडही पुणे लोकसभा जागेसाठी इच्छुक आहेत, मात्र इच्छुक उमेदवारांपैकी कोणत्याही नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू असला तरी आपण नेमका कोणत्या उमेदवाराचा प्रचार करतोय, याचे उत्तर काँग्रेसचे नेतृत्वच कार्यकर्त्यांना देऊ शकते.

दरम्यान, शिवसेना-भाजपा महायुतीने सर्वत्र प्रचारात मोठी आघाडी घेतल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे धाबे दणाणले आहे. आघाडीच्या बिकट परिस्थितीमुळे आजघडीला कोणीही आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणुकीस सामोरे जाण्यास धजावत नाही. त्यामुळे आपसूकच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पक्षश्रेष्ठींना आपापल्या पक्षाची उमेदवारी घ्यावी म्हणून नवख्या तसेच काही अनुभवी उमेदवारांची मनधरणी करावी लागत आहे, मात्र त्यांच्या प्रयत्नांना हवे तेवढे यश येताना दिसत नाही.    

शिवसेना-भाजपा युती होऊन भाजपाने पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बापट यांचा निवडणूक प्रचारही सुरू झाला असून, अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन करण्यासाठी युतीचे नेते धडपडत आहेत, तर दुसरीकडे आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या कोट्यात असल्याने या ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा राजकीय पक्षांपासून कार्यकर्त्यांपर्यंतच्या पुणेकरांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावरही पुणे काँग्रेसचा उमेदवार घोषित करण्यावरून अनेकांनी काँग्रेसची खिल्ली उडवल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी संजय काकडे भाजपामध्ये नाराज असून काँग्रेसकडून पुणे लोकसभा लढवतील, अशा वावड्या उठल्या होत्या, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या स्वप्नाला सुरुंग लावला. त्यामुळे संजय काकडे यांनी भाजपात राहून गिरीश बापट यांच्या उमेदवारीचा प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा पुणे येथील उमेदवार कोण असणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसोबतच पुणेकरांनाही लागून राहिली आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply