म्हसळा : प्रतिनिधी – म्हसळा तालुक्यात शिवसेनेची सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30) पाचगाव आगरी समाज सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यानी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर तोंडसूख घेत भविष्यांत आघाडीमुळे जिल्ह्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस-शेकापप्रमाणे होऊ नये यासाठी आम्ही भविष्यात अभ्यासू राजकीय खेळी खेळणार व यापुढे शिवसेना झुकणार नाही, असे सांगितले.
श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी महायुती राज्य सरकार मधील आहे, परंतु ही युती रायगड जिल्ह्यात नाही. त्यामुळे तटकरे कुटुंबियांचे राजकारण फारसे मनावर घेणे गरजेचे नाही, असे सांगितले. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीत बिघाडी नको म्हणून शिवसैनिकांना शांत रहावे लागते, असे सांगत शिवसैनिकांनो तुमच्यासमोर तगडे आव्हान आहे. म्हणून गाफील राहू नका अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाप्रमाणे आपली देखील परिस्थिती होईल, असा गर्भित इशारा या वेळी युवासेना रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांनी दिला.
या वेळी तालुका प्रमुख महादेव पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विरोधी पक्षनेते बाळ करडे, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,उप तालुका प्रमुख राजाराम तीलटकर, विभाग प्रमुख हेमंत नाक्ती यांनी या स्थानिक पदाधिकार्यानी राज्यातील व जिल्हापातळीवरील पदाधिकार्यांनी श्रीवर्धन मतदारसंघ पोरका केला असून शिवसेना हा महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष आहे, परंतु तालुका प्रशासन (महसूल, पोलीस, जिल्हा परिषद) सुध्दा शिवसेना पदाधिकार्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते असे अभ्यासू शिर्के यानी सांगितले.
श्रीवर्धन मतदारसंघाला कोणी वालीच राहिला नाही का? अशी समस्या उपस्थित करून सध्याच्या परिस्थितीत शिवसैनिकांना कोणीच मार्गदर्शक उरलेले नाही. माजी आमदार अवधूत तटकरे या कार्यक्रमाला आले नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त करताना हे वागणे बरे नव्हे, असा टोला बाळ करडे यांनी लगावला.
या मेळाव्यासाठी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन मतदारसंघ क्षेत्र संघटक रविंद्रजी लाड, भाई कांबळे, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर यांसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.