Breaking News

राज्यातील निर्बंध आणखी कडक

संपूर्ण लॉकडाऊनबाबत आज निर्णय जाहीर होणार

मुंबई ः प्रतिनिधी
संचारबंदी आणि निर्बंध लावूनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब झाले असून, याबाबतचा निर्णय बुधवारी जाहीर केला जाणार आहे.
आठवडाभरापूर्वी संचारबंदी लागू करताना राज्य सरकारने अनेक गोष्टींची मुभा दिली होती. विशेषत: जीवनावश्यक वस्तूची विक्री करणार्‍या दुकानांना मोठी सवलत देण्यात आली होती, मात्र तिथे सातत्याने गर्दी होत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे ’ब्रेक द चेन’च्या नियमांंमध्ये अधिक कठोरता आणण्याची मागणी सरकारमधील काही मंत्र्यांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 20 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. दरम्यान, दुकानांच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्या तरी होम डिलिव्हरीसाठी रात्री 8पर्यंतची मुदत कायम ठेवण्यात आली आहे.
असे आहेत नवे निर्बंध

  • सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडीसह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तिक व संघटनात्मक) सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत उघडे राहतील.
  • वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
  • या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply