आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार
वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अलीकडेच तोडफोड करण्यात आली. असे हल्ले कोरोनाकाळात सेवा देणार्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांचे मनोबल खच्ची करीत असतात. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे
आमदार नाईक यांची पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत सोमवारी कोरोना प्रतिबंध उपाय योजनावर नियमित आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी रुग्णालय तोडफोड प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देत हल्लेखोर प्रवृतीचा निषेध केला. संबंधित रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड झाली. त्याचा मृत्यू कशामुळे झाला. त्या बाबत त्याच्या कुटुंबियाना कशा प्रकारे कळविण्यात आले होते. याची चौकशीची मागणी झाली तर ती अवश्य करावी मात्र रुग्णालयात जेथे अन्य रुग्णही असतात तेथे तोडफोड करणे याचे कधीही समर्थन करता येत नाही. असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी. सुरक्षा रक्षकासमवेत अतिरिक्त पोलीस नेमावे अशी सुचना त्यांनी केली. आयुक्त बांगर यांनी ही सुचना मान्य केली. यंदाही पालिकेने पालिकेचे, परिवहनचे कायम, कंत्राटी, ठोक, मानधन अशा सर्व संवर्गातील कर्मचारी आणि अधिकार्यांना सानुग्रह अनुदान देण्याची व त्यात वाढ करण्याची मागणी आ. नाईक यांनी केली.
येत्या चार ते पाच दिवसात यावर निर्णय घेण्याची ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. आ. नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे महापालिकेने 30 हजार विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती वाटपाचे काम सुरु केले आहे. साडेचार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचे काम आता पर्यंत पूर्ण झाले आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
ऐरोली येथे होल्डिंग पोंडमध्ये एका ठेकेदाराने भराव केला आहे. याबाबत चौकशी करावी असे देखील सुचवले. या वेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, रवींद्र इथापे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, वैभव नाईक तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.