पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहर : कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची जनजागृती मोहीम सुरू केली असून या मोहिमेला पनवेलकरांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले.
वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, विजय तायडे यांनी हद्दीतील सर्व मशिदी, मंदिरांचे मौलाना व पुजार्यांची बैठक घेऊन एकत्र नमाज व प्रार्थना घेऊ नये तसेच गर्दी करू नये. आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जागृती बाळगावी. वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार घ्यावेत. त्याचप्रमाणे शासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध सूचना व आदेशांचे पालन करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
त्याचप्रमाणे शहरातील नाके, बाजारपेठ या ठिकाणी भेटी देऊन मोठ्या संख्येने नागरिक जमणार नाहीत याबाबत सूचना दिल्या. मंदिर व मशिदी बंद ठेवण्याबाबत आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या. त्याचबरोबर पोलिसांची एक गाडी भोंगा लावून लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना आवश्यक त्या सूचना करणे, त्यांच्यातील भीती घालविणे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत. त्या त्या विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या हद्दीत असलेल्या विविध इमारती, चाळी, घरे या ठिकाणी भेटी देऊन रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास त्यांनी त्वरित नजीकच्या हॉस्पिटलशी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती द्यावी, तसेच 30 मार्चपर्यंत सार्वजनिक सण-समारंभ, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम टाळावेत, असे आवाहनसुद्धा पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.