Breaking News

‘महावितरण’चा नागरिकांच्या जिवाशी खेळ!

स्पार्किंग होत असलेल्या विद्युत पोलकडे डोळेझाक; नागरिकांचा संताप

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील विद्युत पोलवर स्पार्किंग होत असून त्याकडे महावितरण कंपनीकडून चक्क दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
महावितरण कंपनीचा बेफिकीर कारभार पनवेलमध्ये पहावयास मिळत आहे. आधीच विजेचा सावळागोंधळ सुरू असताना शहरातील उरण रोड येथील कोळीवाड्याकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील पहिल्याच पोलवर गेल्या काही दिवसांपासून स्पार्किंग होत आहे. पाऊस पडल्यावर तेथे आगीचे लोळ निर्माण होऊन त्याच्या ठिणग्या खाली पडतात. हा रहिवासी भाग असून लगतच एका डॉक्टरचे क्लिनिकही आहे. तेथे नियमित पेशंट येत असतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांनादेखील पोलवरून होत असलेल्या स्पार्किंगमुळे इजा होण्याची भीती आहे. वृद्ध, लहान मुले यांना याचा अधिक धोका संभवतो.
याबाबत स्थानिकांनी जवळच असलेल्या महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या, फोनवरूनही याबाबत कल्पना दिली, मात्र सुस्त असलेला विद्युत विभाग दुरुस्ती करीत नाहीए. त्यामुळे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पहात आहेत का, असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.

पनवेल शहरात विद्युत विभागासंबंधी नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या महावितरण कंपनीने वेळीच दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा. यासाठी अधिकारीवर्गाने स्वतः लक्ष देऊन व कर्मचार्‍यांना योग्य त्या सूचना करून कार्यवाही करावी.
-दर्शना भोईर, माजी नगरसेविका

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply