अलिबाग : प्रतिनिधी
इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2020 स्पर्धेत मुरूड जंजिर्याच्या सुकन्या व चौलच्या स्नुषा समिधा भगत-जंजिरकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या डेडलिफ्ट प्रकारात मास्टर वन गटातून 52 किलो वजनी गटात 85 किलो उचलून समिधा यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला. मुरूडमधील रहिवासी रश्मी रवींद्र जंजिरकर यांच्या त्या कन्या आहेत. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे 14 ते 17 मार्चदरम्यान खेळविण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेकरिता जवळपास 24 राज्यांतून सर्व स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. साधारण दोन महिने आधीच या स्पर्धेची सर्व तयारी सुरू झाली होती, परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने स्पर्धा अत्यंत काळजीपूर्वक घेण्यात आली. स्पर्धेमध्ये खेळाडूंना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये यासाठी स्वच्छतेची दक्षता फेडरेशनतर्फे घेतली होती.
वयाची चाळीशी पार केलेल्या समिधा यांनी एकीकडे घर, शाळा सांभाळत स्वतःच्या तंदुरुस्तीकडेही तेवढेच लक्ष दिले. मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्पर्धेकरिता इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनचे सी. इ. ओ सुब्रता दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अंगात जिद्द आणि चिकाटी असेल तर वयाचे बंधन कधीही आड येऊ शकत नाही. माझे पती संजय भगत हे स्वतः राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू असल्याने त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने मी ही स्पर्धा जिंकू शकले.
-समिधा भगत-जंजिरकर