माणगाव : प्रतिनिधी
येथील डॉ. मोहन दोशी यांची सुमारे तीस हजार रुपये किमतीची फायर फॉक्स ही सायकल चोरीस गेली होती. वाहतूक पोलीस रावसाहेब कोळेकर यांच्या प्रयत्नामुळे चोरीस गेलेली सायकाल दोन तासात परत मिळाली.
डॉ. दोशी यांनी माणगाव एसटी स्टॅण्डसमोरील आपल्या दवाखान्याबाहेर फायर फॉक्स सायकल उभी केली होती. स्टॉलवरुन पेपर घेऊन येईपर्यंत चोरट्याने सायकल लंपास केली. एक दाढीवाला भिकारी सायकल घेऊन इंदापूरच्या दिशेने गेल्याचे जवळच्या चहावाल्याने सांगितले. हा धागा पकडून वाहतूक पोलीस रावसाहेब कोळेकर यांनी तपास सुरु केला. ओपन अंब्रेला हॉटेलजवळ एक दाढीवाला इसम सायकल घेऊन इंदापूरकडे जात असताना कोळेकर यांना दिसला. अधिक चौकशीत सदर इसमाने सायकल चोरल्याचे कबूल केले आणि दोन तासातच डॉ. दोशी यांना सायकल परत मिळाली.