Breaking News

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका

मुंबई ः प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. अण्णा हजारे म्हणाले की, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रे लिहिली, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीनंतर आपण पाहू असे उत्तर पाठवले आहे. हा कायदा जर आणला नाही, तर मी पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी सांगितले. आपल्या पुढील वाटचालीबद्दल अण्णांनी सांगितले की, वयाच्या 25व्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन समाजसेवेचे व्रत मी माझ्या आयुष्यात घेतले आहे. त्यामुळे जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत गाव, समाज आणि देशाची सेवा करायची आहे. शरीरात प्राण असेपर्यंत हे थांबवता येणार नाही. दसर्‍याला ग्रामसभेत मी नवीन कार्यकर्ते पुढे येत असल्याचे पाहून त्यांच्यावर जबाबदारी टाकणार आहे, असे म्हणालो, मात्र कार्यातून मुक्त होणार नाही.

मंदिरे का उघडली जात नाहीत?

अध्यात्माशिवाय माणसात बदल होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे, मात्र मंदिरे उघडताना राजकारण करू नये. बिअर बार उघडले, चित्रपटगृहे उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत, असा सवाल अण्णांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply